कोरोनानंतर भारतीय अर्थव्यवस्था थोडीफार सावरत असतानाच आता अर्थव्यवस्थेपुढे आणखी एक संकट उभे राहिले आहे. मागील काही दिवसांपासून डाॅलरच्या (dollar) तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण सुरू आहे. आता रुपया (rupee) निचांकी प्रती डाॅलर 80 च्या पातळीवर आला आहे. भारतीय इतिहासातील ही सर्वात निचांकी पातळी आहे. यूपीए सरकारच्या 2004 ते 2014 या कालावधीत डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन 20 ने झाले आहे. वर्ष 2014 च्या सुरुवातीस रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत 61.8 होती.
डॉलरच्या तुलनेत रुपयासाठी हे वर्ष चांगले राहिले नाही. 2022 च्या सुरुवातीपासून रुपयाचे अवमूल्यन होत आहे आणि फेब्रुवारीमध्ये रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर संकट आणखी वाढले. या वर्षी जानेवारीपासून रुपयाचे मूल्य सुमारे सहा टक्क्यांनी घसरले आहे.
रुपयाच्या घसरणीची कारणे
- युक्रेन-रशिया युद्ध
रुपयाचे मूल्य घसरण्यामागे एक नाही तर अनेक कारणे आहेत. जागतिक अर्थव्यवस्थेतील रुपया हे एकमेव चलन नाही जे डॉलरच्या तुलनेत कमकुवत झाले आहे. तर जगातील श्रीमंत आर्थिक देशांचे चलनही कमकुवत झाले आहे. या सर्वांमागील कारणेही जवळपास सारखीच दिसतात. युक्रेन-रशिया यांच्यात सुरू असलेले युद्ध हे पहिले कारण मानले जाऊ शकते. या दोन देशांमधील भांडणामुळे जागतिक अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. कोविडमुळे चालू असलेली आर्थिक मंदी हे देखील या मागचे एक प्रमुख कारण आहे.
2. परकीय गुंतवणूकदारांचा भ्रमनिरास
रुपयाच्या घसरणीचे एक मोठे कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतातून आपली गुंतवणूक काढून घेणे हे सांगितले जात आहे. एका अंदाजानुसार, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी गेल्या सहा महिन्यांत भारतातून सुमारे 2,320 अब्ज रुपये काढले आहेत. परकीय गुंतवणूकदारांचे पैसे काढून घेणे हे या वेळी भारताला गुंतवणूक करणे सुरक्षित मानत नसल्याचे लक्षण आहे.
3. डॉलर निर्देशांकात सतत वाढ
घसरणीचे आणखी एक कारण म्हणजे डॉलर निर्देशांक सतत वाढत असल्याचेही सांगितले जात आहे. या निर्देशांकांतर्गत पौंड, युरो, रुपया, येन या जगातील प्रमुख चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरची कामगिरी पाहिली जाते. निर्देशांकात वाढ म्हणजे सर्व चलनांच्या तुलनेत डॉलर मजबूत होतो. अशा स्थितीत इतर चलने डॉलरच्या तुलनेत घसरतात.
कमकुवत होणाऱ्या रुपयाचे तोटे
आयातीसाठी जास्त पैसे
भारतीय अर्थव्यवस्था ही आयात आधारित अर्थव्यवस्था आहे. निर्यातीच्या तुलनेत आयातीचा वाटा नेहमीच जास्त राहिला आहे. त्यामुळे रुपयाच्या घसरणीचा पहिला तोटा हा होईल की भारताला आयातीसाठी जास्त पैसे मोजावे लागतील. परिणामी देशाचा चलनाचा साठा कमी होईल. गेल्या 8 वर्षांत अभूतपूर्व परकीय चलन साठा हे भारतासाठी मोठे यश आहे. पण आधीच गुंतवणूकदारांच्या माध्यमातून भारतातून पैसे काढून घेतल्याने परकीय चलनाच्या साठ्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे. तर आता कमजोर होत असलेल्या रुपयाच्या रूपाने दुहेरी फटका बसणार आहे.
परकीय चलनाचा साठा
गेल्या वर्षी 3 सप्टेंबर 2021 रोजी प्रथम, परकीय चलनाचा साठा 642.5 अब्ज डॉलरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. मात्र, सध्या,भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की 1 जुलै रोजी परकीय चलनाचा साठा 588.314 अब्ज डाॅलर इतका खाली आला होता.
व्यापार तू़ट वाढली
डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मोठ्या घसरणीमुळे देशाची व्यापार तूटही वाढत आहे. निर्यातीपेक्षा आयातीसाठी जास्त पैसे मोजावे लागत असल्याने व्यापार तूट वाढत चालली आहे. जूनमध्ये देशाची व्यापार तूट 26.18 अब्ज डॉलर होती, तर जून 2021 मध्ये ती केवळ 9.60 अब्ज डाॅलर होती.
महागाई वाढणार
कमजोर होत असलेल्या रुपयाचा फटका महागाईच्या रूपातही दिसून येत आहे. भारत पेट्रोलियम पदार्थांची सर्वाधिक आयात करतो. रुपयाच्या कमकुवतपणामुळे पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीवर मोठा खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे कंपन्या डिझेल आणि पेट्रोलच्या किमती पुन्हा एकदा वाढवतील. त्याचा परिणाम थेट सर्वसामान्यांवर होणार आहे. यासोबतच भारत खाद्यतेल आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादनेही मोठ्या प्रमाणावर आयात करतो. त्यामुळे या वस्तूही महाग होतील. अशा परिस्थितीत आधीच महागाईने होरपळत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी वाईट दिवस येतील.
डॉलरच्या मक्तेदारीला आव्हान?
भारत आयातीसाठी बहुतांशी परकीय चलनाच्या रूपात डॉलर देत असल्याने भारतावर नेहमीच डॉलरच्या चलनाचा विशेष दबाव असतो. अलीकडे भारताने अनेक देशांशी केवळ भारतीय रुपयात व्यापार करण्यासाठी करार केले आहेतय यात प्रामुख्याने रशिया आणि इराण सारख्या देशांचा समावेश आहे. या देशांचा एक फायदा म्हणजे पेट्रोलियम उत्पादनांची आयात सुलभ होईल. जागतिक अर्थव्यवस्थेचे समीकरणही आता असेच सांगत आहे की, जगाने व्यापारासाठी डॉलर व्यतिरिक्त अधिकाधिक चलन वापरण्याची गरज आहे. डॉलरच्या मक्तेदारीला आव्हान दिल्याने इतर देश जागतिक व्यापारात प्रस्थापित होतील.
This Post Has One Comment