सरकारने नवीन आर्थिक वर्षात PPF, सुकन्या समृद्धी योजना, ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि महिला सन्मान योजना यासारख्या छोट्या योजनांच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.
या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी पॅन आणि आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. यापूर्वी आधार नसतानाही पोस्ट ऑफिस योजनांमध्ये गुंतवणूक करता येत होती. छोट्या योजना पोस्ट ऑफिस स्कीम म्हणूनही ओळखल्या जातात.
अर्थ मंत्रालयाने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, आता छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधार क्रमांक देणे बंधनकारक असेल.
खाते उघडण्याच्या वेळी आधार क्रमांक उपलब्ध नसल्यास, नावनोंदणी स्लिप दिली जाऊ शकते. मात्र सहा महिन्यांच्या आत आधार कार्ड देणे बंधनकारक असेल. जर कोणी आधार देऊ शकत नसेल तर तो खात्यात गुंतवणूक करू शकणार नाही. म्हणजेच त्याचे खाते गोठवले जाईल.
मंत्रालयाने ३१ मार्च रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत असेही म्हटले आहे की, लहान बचत योजना खाते उघडताना पॅन किंवा फॉर्म ६० सबमिट करावा लागेल. खाते उघडताना कोणत्याही कारणास्तव पॅन जमा केले नसेल तर ते दोन महिन्यांच्या आत जमा करावा लागेल.
नोटिफिकेशनमध्ये असे म्हटले आहे की, जर खात्यातील शिल्लक ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल किंवा आर्थिक वर्षातील सर्व प्रकारचे क्रेडिट एक लाखापेक्षा जास्त असेल किंवा एका महिन्यात पैसे काढण्याची आणि हस्तांतरणाची रक्कम दहा हजारांपेक्षा जास्त असेल तर पॅन डिपॉझिट करणे आवश्यक असेल.
दोन महिन्यांत पॅन जमा न केल्यास खाते गोठवले जाईल. गुंतवणुकीच्या वेळी पोस्ट ऑफिस किंवा बँक आणखी कागदपत्रे मागू शकतात, असे नोटिफिकेशनमध्ये म्हटले आहे. विद्यमान सदस्यांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत त्यांचा आधार क्रमांक सादर करावा लागेल. जर त्याने असे केले नाही तर त्याचे खाते १ ऑक्टोबर २०२३ रोजी गोठवले जाईल.
काय द्यावे लागणार ?
यापूर्वी पॅन किंवा आधार देण्याची गरज नव्हती. पाणी, वीज, टेलिफोन बिल, म्युनिसिपल टॅक्स रिसीट, प्रॉपर्टी टॅक्स पावती, पेन्शन किंवा फॅमिली पेन्शन ऑर्डर पुरेशी असायची.
पण आता छोट्या बचत योजनांमध्ये खाते उघडण्यासाठी पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार क्रमांक किंवा आधार नोंदणी स्लिप आणि पॅन देणे आवश्यक आहे.
सरकारने नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत लहान बचत योजनांवरील व्याज 70 bps पर्यंत वाढवले आहे. NSC वर 70 bps ने तर सुकन्या समृद्धी वर 40 bps आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर 20 bps ने वाढ केली आहे. पीपीएफवरील व्याजात कोणताही बदल झालेला नाही.