Banking Crisis : अमेरिका आणि युरोपच्या बँकिंग संकटाने (USA-Europe Banking Crisis) जगभरातील बाजारपेठांना धक्का दिला आहे. भारतीय बाजारपेठेवरही याचा परिणाम झालेला आहे. शेअर बाजारात सूचिबद्ध बड्या भारतीय कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) च्या शेअर्समध्ये घसरण झाली. अमेरिका आणि युरोपमधील बँकिंग संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बँकांच्या शेअर्सवरही दबाव दिसून येत आहे. अमेरिकेत दोन बँकांना टाळे लागले असून हे संकट इतर अनेक बँकांवरही येताना दिसत आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स :
भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स गेल्या काही दिवसांपासून घसरले आहेत. मात्र, सोमवारी शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. पण मार्च महिन्यात सलग आठ दिवस रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स घसरले. यानंतर त्यात तेजी आली.
सध्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तर गेल्या पाच दिवसांत रिलायन्सच्या शेअर्समध्ये 0.79 टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या एका महिन्यात हा स्टॉक 6.24 टक्क्यांनी घसरला आहे. (Banking Crisis In America And Europe Why Reliance And TCS Shares Are Falling In India Know Reasons)
आज सकाळच्या व्यवहारात तो रु. 2,219.15 वर व्यवहार करत होता. वाढत्या व्याजदरांमुळे रिलायन्सच्या रिटेल आणि टेलिकॉम व्यवसायात मंदीचे सावट असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्याचा परिणाम शेअरवर दिसून येत आहे. याशिवाय एफआयआयच्या विक्रीमुळेही शेअर घसरत आहेत.
Reliance Shares
TCS शेअर्सची स्थिती :
टीसीएसच्या शेअर्समध्येही आज तेजी पाहायला मिळत आहे. मात्र गेल्या पाच दिवसांत या आयटी कंपनीचे शेअर्स 0.12 टक्क्यांनी घसरले आहेत.
आतापर्यंत अमेरिकेच्या दोन बँका बुडाल्या आहेत पण फेड रिझर्व्हने व्याजदरात पुन्हा एकदा वाढ केल्यास आणखी अनेक बँकांवर संकट ओढवण्याची भीती आहे. असे झाल्यास भारताच्या आयटी उद्योगावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
TCS Shares
एचएफएस रिसर्चचे संस्थापक फिल फर्श म्हणतात की यूएस प्रादेशिक बँकांची आर्थिक स्थिती वाईट आहे. त्यामुळे त्यांना सेवा देणाऱ्या कंपन्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यामध्ये टीसीएस आणि इन्फोसिसचाही समावेश आहे.
फर्श म्हणाले, ‘मी या आठवड्यात एका आयटी फर्मच्या सीईओशी बोललो आहे. त्यांनी सांगितले की संपूर्ण क्षेत्र बँकिंग संकटामुळे चिंतेत आहे. त्याचा दबाव टीसीएसच्या शेअर्सवर दिसून येत आहे.
भारतीय बँकांच्या शेअर्सची स्थिती :
दुसरीकडे देशातील बड्या बँकांचे शेअर्स बघितले तर त्यांची स्थितीही काहीशी चांगली नाही. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये गेल्या पाच दिवसांत 2.30 टक्क्यांची वाढ झाली आहे. एका महिन्यात हा शेअर 3.64 टक्क्यांनी घसरला आहे.
दुसरीकडे, खाजगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये गेल्या पाच दिवसांत त्यात 0.21 टक्क्यांची किरकोळ वाढ झाली आहे. आज सकाळच्या व्यवहारात शेअर 0.67 टक्क्यांच्या वाढीसह 1,571.15 रुपयांवर व्यवहार करत होता.
आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्सची कामगिरीही गेल्या पाच दिवसांत काही विशेष राहिलेली नाही. पंजाब नॅशनल बँकेचे शेअर्स गेल्या पाच दिवसांत 3.91 टक्क्यांनी घसरले आहेत.
सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक बुडल्यानंतर, अमेरिकेचे बँकिंग संकट आणखी अनेक बँकांना आपल्या कवेत घेऊ शकते. युरोपची क्रेडिट सुइस बँक संकटात अडकली आणि विकली गेली.
परिस्थिती सुधारली नाही तर सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक सारख्या संकटात अमेरिकेतील सुमारे 110 बँका अडकू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. बँकिंग संकट सोडवण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने बँकांना 250 अब्ज डॉलरची आर्थिक मदत दिली आहे.