मुंबई : शेअर मार्केटमध्ये दमदार फंडामेटल असणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक कधीही वाया जात नाही. कारण हेच शेअर्स मार्केट अस्थिर असताना तुम्हाला तोटा होऊ देत नाही. अशाच शेअर्समध्ये भारत गियर्स लिमिटेडची (BGL) गणना होते.
भारत गियर्स लिमिटेड विविध प्रकारच्या रिंग गियर्स, ट्रान्समिशन गियर्स, शाफ्ट्स आणि डिफरेंशियल गियर्सचे उत्पादन करते. हे गिअर्स आणि शाफ्ट्स आजच्या हायस्पीड ऑटोमोबाईल्ससाठीचा अविभाज्य भाग आहेत. भारत गियर्स लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी गिअर उत्पादक आणि ऑटोमोटिव्ह गिअर्सची आघाडीची जागतिक पुरवठादार आहे.
कंपनीकडे मुंब्रा, फरिदाबाद आणि साताऱ्यात अत्याधुनिक उत्पादन सुविधा आहेत. याशिवाय, कंपनीचे 70 पेक्षा जास्त डीलर्सचे मोठे नेटवर्क भारतभर 26 राज्यांमध्ये पसरलेले आहे. त्याच्या प्रमुख ग्राहकांमध्ये अशोक लेलँड, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, जॉन डीअर यूके आणि झेडएफ युएसए यांचा समावेश आहे. हेही वाचा – मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार….
भारत गिअर्सचे शेअर्स सध्या 127.70 रुपयांवर व्यवहार करत आहेत. हा आकडा मागील दोन वर्षांच्या तुलनेत सुमारे 300 टक्के अधिक आहेत. 23 नोव्हेंबर 2020 रोजी या शेअरने 33.89 रुपयांवर ट्रेडींग सुरु केली आणि या दोन वर्षांच्या होल्डिंग कालावधीत उत्कृष्ट परतावा दिला.
कंपनीच्या महसुलात वाढ
आर्थिक वर्ष 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 14.42% वार्षिक वाढून 213.55 कोटी झाला आणि पीएटी अर्थात प्रॉफीट आफ्टर टॅक्स 5.76 कोटी झाला. कंपनीने महसुलात चांगली वाढ दर्शविली आहे, पण खर्च वाढला आहे.
195 कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह, कंपनीचे आरओई आणि आरओसीई अनुक्रमे 25.5 टक्के आणि 24.1 टक्के आहेत. अशातच आगामी काळात या शेअरकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करू शकतो असा विश्वास मार्केट एक्सपर्ट व्यक्त करत आहेत. लाँग टर्म गुंतवणूकदारांनी तसेच मोमेंटम ट्रेडर्सनी हा स्टॉक त्यांच्या वॉचलिस्टमध्ये ठेवण्याचा सल्लाही एक्सपर्ट्स देत आहेत.
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.