TRAI New Tariff Order 2.0 : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने नवीन टॅरिफ ऑर्डर (New Tariff Order-NTO) 2.0 मध्ये सुधारणा केली आहे. आता केबल आणि डीटीएच ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. नवीन नियमानुसार, 19 रुपयांपेक्षा कमी किमतीचे चॅनेल एका प्लॅनमध्ये सामील होऊ शकतील. TRAI चे सचिव, व्ही. रघुनंदन यांनी नवीन नियमांबाबत अधिसूचना जारी केली आहे.
नवीन अधिसूचनेनुसार, सर्व वितरक त्यांच्या पे चॅनेलच्या ची किंमत निश्चित करताना, प्लॅन असलेल्या सर्व पे चॅनेलच्या किंमतीवर जास्तीत जास्त 45 टक्के सूट देऊ शकतात. सध्या फक्त 33 टक्के सूट दिली जाऊ शकते. ट्रायचे म्हणणे आहे की, पे चॅनलची किंमत वितरकाने दिलेल्या सवलतीवर आधारित असेल.
TRAI चे हे नवीन नियम 1 फेब्रुवारी 2023 पासून लागू होतील. TRAI च्या मते, टेलिव्हिजन चॅनेलचे सर्व वितरक हे निश्चित करतील की, 1 फेब्रुवारी 2023 पर्यंत, ग्राहकांना प्लॅन किंवा त्यांनी निवडलेल्या चॅनेलनुसार सेवा प्रदान केल्या जातील.
ट्रायने असेही म्हटले आहे की, वितरक सर्व चॅनेलचे नाव, भाषा, चॅनेलची दरमहा किंमत आणि चॅनेलच्या प्लॅनची रचना आणि किमती मधील कोणत्याही बदलाचा अहवाल 16 डिसेंबर 2022 पर्यंत देतील.